१७ एप्रिलला सिनेमागृहांमध्ये येणार 'लाडकी बहीण'
मुंबई, 07 मार्च, (हिं.स.)। काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचे काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्
गीत-संगीताच्या मेजवानीसह कौटुंबिक मनोरंजनाचे परीपूर्ण पॅकेज


मुंबई, 07 मार्च, (हिं.स.)। काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचे काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित 'लाडकी बहिण योजने'चे समाजात विविध प्रकारे पडसाद उमटले. सरकारी योजनेतील 'लाडकी बहीण' चहूबाजूला चर्चेचा विषय ठरली. आता हिच 'लाडकी बहीण' रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. '१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी' असे म्हणत 'लाडकी बहीण' हा आगामी चित्रपट १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत 'लाडकी बहीण' चित्रपटाच्या दिग्दर्शिका शितल शिंदे असून, त्यांनी शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मितीही केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. बाबासाहेब पाटील या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. लेखक प्रताप गंगावणे चित्रपटाचे मार्गदर्शक असून, शेखर मते, पंकज चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, लहू साळुंखे यांचे 'लाडकी बहीण'ला विशेष सहकार्य लाभले आहे. चित्रपटाचे 'लाडकी बहीण' हे शीर्षक खूप विचार करायला लावणारे आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याचे संकेत पोस्टरवर दिलेल्या टॅगलाईनवरून मिळतात. हा चित्रपट फक्त शासकीय योजनेवर भाष्य करणारा आहे की, यात आणखी काही नाट्यमय घडामोडी दडलेल्या आहेत याबाबतही कुतूहल वाटते. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेगा शिंदे आदी कलाकार आहेत. एखाादी सरकारी योजना सर्वसामान्य गृहिणीच्या संसाराला कशा प्रकारे हातभार लावू शकते याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ...' या उक्तीचा अवलंब करीत गोरगरीब महिला एकत्र येतात आणि कशा प्रकारे आपला उत्कर्ष साधतात हा एक महत्त्वपूर्ण पैलू 'लाडकी बहीण'मध्ये आहे. सरकारी कार्यालयांपासून सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला एक महत्त्वपूर्ण विषय हसत-खेळत या चित्रपटात मांडण्यात आला आहे. आशयघन गोष्ट, उत्कंठावर्धक घडामोडी, सर्वसामान्यांच्या भावना, सुमधूर गीत-संगीत, बहारदार नृत्य, लक्षवेधी अभिनय आणि एक सशक्त संदेश देत हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे परिपूर्ण मनोरंजन करेल असा ठाम विश्वास दिग्दर्शक शितल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करताना विषयातील गांभीर्य कायम राखण्याचे काम 'लाडकी बहीण' चित्रपटात करण्यात आले आहे. मराठीतील नामवंत कलाकारांचा अभिनय रसिकांना अखेरपर्यत खिळवून ठेवणारा ठरणार असून, लावणी क्वीन गौतमी पाटीलची गवळण रसिकांवर मोहिनी घालणार आहे. चिनू चेतन यांनी या चित्रपटातील गीतांची कोरिओग्राफी केली असून, संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. बाबा लाड, चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गायक-संगीतकार उमेश गवळी. तसेच आनंद शिंदे व गायत्री शेलार यांच्या आवाजात 'लाडकी बहीण'मधील गाणी संगीतबद्ध करण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande