
पुणे, 06 मार्च, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केरळ राज्यातील मल्याळम भाषेतील आशयसंपन्न‘मलवाझी’या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावत महोत्सवात विशेष ठसा उमटवला. तर मराठी भाषेतील‘अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री’या संवेदनशील मांडणी असलेल्या लघुपटाने प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार पटकावला. अॅनिमेशन विभागात राजस्थान येथील‘द वेट वॉल’या चित्रपटाने आपली वेगळी छाप पाडत सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्मचा मान मिळवला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दुलाल रॉय व प्रणव जोशी यांना,तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिथिला हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या‘साबर बोंडं’या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांना‘पीसीआयएफएफ युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार २०२६’प्रदान करून गौरविण्यात आले. या महोत्सवात भारतासह जर्मनी,इटली,स्पेन,पोलंड,ब्राझिल,युएई यासह ४३ देशांमधील ११६ पेक्षा अधिक चित्रपट,लघुपट,माहितीपट,अॅनिमेशन चित्रपट आणि ६० सेकंदांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी,गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग,महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच महापौर रवि लांडगे,उपमहापौर शर्मिला बाबर,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,कला व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’चा पुरस्कार वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात देश-विदेशातील कलावंतांना विविध विभागांतील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर,क्रीडा,कला व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे,नगरसदस्या प्रियंका कुदळे यांच्यासह महापालिका उपायुक्त पंकज पाटील,विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड,चित्रपट निर्माते नितीन वैद्य,अभिनेते श्रीकांत यादव,दिग्दर्शक तेजस देऊसकर,अभिनेते इनाम उल हक,दिग्दर्शक रोहन कानवडे,गोरख कातोरे,सोमनाथ शितोळे,डॉ. पांडुरंग भोसले,चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडाबे,श्रीकांत आगवणे,मोदीत सिंघल,पल्लवी सिंघल,पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीचे दत्ता गुंड,अभिषेक अवचार,डॉ. विश्वास शेंबेकर,जय भोसले,गाथा फिल्म सोसायटीचे पूजा गुंड,श्रुती शेंबेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु