
रत्नागिरी, 6 मार्च, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 10 दिवसीय बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ आज झाला.
बालरंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन बालकलाकार तयार व्हावेत या हेतूने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांच्या नियोजनाखाली या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे नाट्य प्रशिक्षण शिबिर 15 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी वय वर्षे 6 ते 15 या वयोगटातील नवोदित बालकलाकारांसाठी आहे. प्रशिक्षणामध्ये कुठलेही मूल्य आकारले जाणार नसून प्रवेश विनामूल्य आहे.
या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून सौ. वेदा सोनुले ( कोल्हापूर ), श्री. प्रकाश पारखी ( पुणे ), प्रसिद्ध नेपथ्यकार संदेश बेंद्रे ( मुंबई ), अभिनेत्री कीर्ती पेंढारकर ( डोंबिवली ), संजय हळदीकर (कोल्हापूर ), रंगभूषाकार श्री. प्रदीप पाटणकर ( मुंबई ), श्री. साईप्रसाद शिर्सेकर , ज्येष्ठ रंगकर्मी श्री. राजकिरण दळी, श्री. सत्तू गुरव असे ज्येष्ठ आणि तरुण रंगकर्मी, नाट्य कलावंत, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक हे दिग्गज मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.
सोबतच प्रशिक्षण संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्रसुद्धा दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सादरीकरणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे शिबिर संचालक श्री. शहबाज गोलंदाज यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी शहाबाज गोलंदाज (99222 40314)
यांच्याशी संपर्क करावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी