
परभणी, 01 एप्रिल (हिं.स.)।
तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता निझामाबाद–तिरुपती धावणारी रायलसीमा एक्सप्रेस किमान परभणीपर्यंत वाढवावी, अशी जोरदार मागणी मराठवाड्यातील बालाजी भक्तांकडून होत आहे. या मागणीसाठी भक्तांनी अनोखे SMS आंदोलन सुरू करत स्थानिक खासदारांना साकडे घातले आहे. सध्या परभणी व नांदेड येथून तिरुपतीसाठी दररोज थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निझामाबाद–तिरुपती रायलसीमा सुपरफास्ट एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. भक्तांच्या मते, मराठवाड्यासाठी पूर्वी नांदेड–मुंबई धावणारी देवगिरी एक्सप्रेस नंतर सिकंदराबाद आणि पुढे लिंगमपल्लीपर्यंत वाढवण्यात आली. मग हजारो भाविकांना उपयोगी ठरणारी रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत का वाढवू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खा. अशोक चव्हाण, खा. रवींद्र चव्हाण, खा. रामराव वडकुते, खा. आष्टीकर, ख्. संजय जाधव, खा. डॉ. अजित गोपछेडे आदी खासदारांना बालाजी भक्तांकडून SMS पाठवून मागणी केली जात आहे. रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढविल्यास हजारो भाविकांना तिरुपती दर्शनासाठी मोठी सोय होणार आहे. तसेच व्यापारी दृष्टीने सिकंदराबादपर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा लाभ होईल, अशी प्रतिक्रिया भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांनी दिली. भक्तांनी पुढे म्हटले आहे की, मराठवाड्यातील खासदारांनी हा विषय रेल्वे मंत्र्यांकडे तातडीने मांडून मार्ग काढावा. रेल्वे परभणीपर्यंत आल्यास वेळेची बचत होऊन प्रवाशांना थेट सुविधा मिळणार आहे. दरम्यान, देवगिरी एक्सप्रेसप्रमाणे राज्यराणी एक्सप्रेसही पुढे वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयींना बाधा पोहोचल्यास मराठवाड्यातील प्रवासी संघटना आंदोलन उभारण्याचा इशारा देत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis