
परभणी, 01 एप्रिल (हिं.स.)।
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मधील रखडलेली प्रकल्पग्रस्त पदभरती तात्काळ सुरू करावी, अन्यथा येत्या १४ एप्रिल रोजी सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. बुधवारी (दि. १) विद्यापीठाच्या कुलसचिवांना देण्यात आलेल्या निवेदनातून हा इशारा देण्यात आला.
प्रकल्पग्रस्तांनी यापूर्वीही पदभरतीसंदर्भात अनेकदा निवेदने देऊन उपोषणे व आंदोलने केली आहेत. मात्र, अद्याप विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. शासनाने विशेष प्रकल्पग्रस्त भरतीचे आदेश दिले असतानाही परभणीतील या विद्यापीठानेच उदासीन भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. इतर विद्यापीठांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या गट-ड पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या दिल्या आहेत. मात्र, परभणी विद्यापीठाने केवळ जाहिरात प्रसिद्ध करून पुढील प्रक्रिया रखडवून ठेवली आहे. त्यामुळे जाहिरातीस मुदतवाढ न देता तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत सर्व पदांसाठी परीक्षा घेऊन नियुक्ती आदेश द्यावेत, अन्यथा १४ एप्रिल रोजी सामूहिक आत्मदहनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर सुनील रणेर, कुंडलिक शिंदे, शिवाजी रणेर, अंशिराम कुटे, सोपान ढगे, लक्ष्मण शिंदे यांच्यासह ३५ हून अधिक प्रकल्पग्रस्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis