राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर
मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) - भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी भाजपकडून शिवाजी कर्डिलेंचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याविरो
अक्षय कर्डिले


मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) - भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी भाजपकडून शिवाजी कर्डिलेंचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे शड्डू ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अक्षय कर्डिले सध्या जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असून, त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने मतदारसंघातील कर्डिले समर्थकांना मोठे बळ दिले आहे.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. माजी खासदार सुजय विखे पाटील देखील इच्छुक होते. तिकिट मिळवण्याकरिता मोठी ताकद लावली होती. या पोट निवडणुकीसाठी आपणच पहिल्या क्रमांकाची पसंती असल्याचे सुजय विखे पाटील सांगत होते.

शिवाजी कर्डिले अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदारपद भूषवत होते. त्यांनी आतापर्यंत सहा वेळा आमदारकी भूषवली होती. मोठ्या आजारपणातून सावरल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहिल्यानगरच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्ती असलेल्या शिवाजी कार्डिले यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यांना अहिल्यानगरच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जात होते.

महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी यांसह देशभरातील आठ जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकांसाठी 6 एप्रिलला अर्ज भरणे, माघारीची मुदत ९ एप्रिल आणि २३ एप्रिलला मतदान होईल. तर 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande