
नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आज, बुधवारी सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी (19 किलो) सिलेंडरच्या दरात 195.50 रुपयांची मोठी वाढ केली आहे.या दरवाढीमागे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील वाढते लष्करी संघर्ष आणि अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरची किंमत आता 2,078.50 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 1 मार्च रोजीही 114.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात कमर्शियल गॅसच्या दरात 300 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.या दरवाढीचा थेट परिणाम रेस्टॉरंट, ढाबे आणि केटरिंग व्यवसायाशी संबंधित लोकांवर होणार असून त्यांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात बाहेरचे जेवण आणि इतर खाद्यपदार्थही महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान , दिलासा देणारी बाब म्हणजे घरगुती वापराच्या एलपीजी (14.2 किलो) सिलेंडरच्या किंमतीत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी