
नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.)उत्तर गोव्यातील नाईटक्लब आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अंजुनाजवळील 'बर्च बाय रोमियो लेन' क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात क्लब मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. म्हापसा येथील जेएमएफसी न्यायालयाने दोन्ही भावांना सशर्त जामीन मंजूर केला असून, त्यामुळे त्यांच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणात गंभीर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली लुथरा बंधूंना अटक करण्यात आली होती आणि ते सध्या कोलवाळे मध्यवर्ती कारागृहात होते. न्यायालयाने त्यांना ५०,००० रुपयांच्या जामिनावर आणि काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. पण, जामिनामागील सविस्तर कारण न्यायालयाचा लेखी आदेश जारी झाल्यानंतर स्पष्ट होईल.
हे संपूर्ण प्रकरण ६ डिसेंबर २०२५ रोजी आरपोरा येथील एका नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीशी संबंधित आहे. या दुःखद घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला आणि पन्नासहून अधिक जण जखमी झाले होते. ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. आगीनंतर, दोन्ही आरोपी थायलंडला पळून गेले आणि १७ डिसेंबर रोजी त्यांना भारतात परत आणण्यात आले. तेव्हापासून त्यांना उत्तर गोव्यातील कोलवाळ तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
तपासात असे उघड झाले की क्लबमध्ये सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. असा आरोप आहे की, क्लब आवश्यक नियमांशिवाय चालवला जात होता आणि बनावट ना हरकत प्रमाणपत्राद्वारे (NOC) परवाना मिळवण्यात आला होता. पोलिसांनी असाही दावा केला आहे की, घटनेनंतर लुथरा बंधू देश सोडून थायलंडला पळून गेले, जिथून त्यांना नंतर भारतात परत आणून अटक करण्यात आली.
दोन्ही भावांचा अटकपूर्व जामीन यापूर्वीच फेटाळण्यात आला होता. शिवाय, सत्र न्यायालयाने अलीकडेच बनावट ना हरकत प्रमाणपत्राशी संबंधित एका वेगळ्या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आगीच्या दुर्घटनेच्या प्रकरणात त्यांना आता जामीन मंजूर झाला असला तरी, फसवणूक आणि परवाना घोटाळ्याशी संबंधित प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. त्या प्रकरणात लुथरा बंधूंच्या कायदेशीर अडचणी सुरूच असल्याचे दिसते आणि पुढील कार्यवाही सुरू राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे