
दिब्रुगड, १ एप्रिल (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी आसाममधील दिब्रुगड येथे दाखल झाले. त्यांनी तेथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांची भेट घेतली. त्यांच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी एक सेल्फीसुद्धा काढला. पंतप्रधान मोदींनी चहाच्या मळ्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
दिब्रुगढमधील चहाच्या मळ्याचे फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी लिहिले, चहा हा आसामचा आत्मा आहे. येथे उत्पादित होणाऱ्या चहाला जगभरात ओळख मिळाली आहे. आज सकाळी दिब्रुगढमध्ये मी एका चहाच्या मळ्याला भेट दिली आणि तेथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. हा एक खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, चहाची पाने खुडल्यानंतर, त्या महिलांनी मला त्यांच्या संस्कृतीबद्दल सांगितले आणि नंतर सेल्फी काढला. आम्हाला सर्व चहा मळ्यातील कुटुंबांच्या प्रयत्नांचा खूप अभिमान आहे. त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने आसामची प्रतिष्ठा आणखी वाढवली आहे. आसाममध्ये ९ एप्रिल रोजी निवडणुका होत आहेत. ४ मे रोजी निकाल जाहीर होतील. भाजप सत्तेत आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासमोर स्वबळावर आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष त्यांना थेट टक्कर देत असल्याचे दिसत आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे