
गुवाहाटी, 11 एप्रिल (हिं.स.)आयपीएल २०२६ चा उदयोन्मुख तारा, वैभव सूर्यवंशी, याला आता महान विराट कोहलीकडून प्रशंसा मिळाली आहे. सामन्यानंतर वैभवने कोहलीकडून स्वाक्षरी घेतली, पण कोहलीने केवळ सहीच केली नाही, तर एक खास संदेशही लिहिला, ज्यामुळे या युवा क्रिकेटपटूचा प्रवास आणखी खास बनला आहे. कोहलीने लिहिले, प्रिय वैभव, छान खेळलास. हा एक छोटासा संदेश आहे, पण क्रिकेटच्या एका मोठ्या नावाकडून अशी प्रशंसा मिळणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी एक मोठे यश आहे.
जराजस्थान रॉयल्स २०२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरले, तेव्हा सामना सोपा वाटत नव्हता. पण वैभवने पॉवरप्लेमध्येच सामन्याचे चित्र पालटले. त्याने भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडसारख्या अनुभवी गोलंदाजांविरुद्ध आक्रमकपणे आणि निर्भयपणे फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव आणला.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या २६ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या होत्या. त्याने ३०० च्या स्ट्राईक रेटने धावा करून बंगळूरच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. आपल्या या झंझावती खेळीत त्याने ७ षटकार आणि ८ चौकार मारले. या सामन्यानंतर, वैभवच्या प्रभावी कामगिरीने ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आघाडी घेतली आहे. त्याने दोन अर्धशतकांसह केवळ चार सामन्यांमध्ये २०० धावा केल्या आहेत. त्याने यशस्वी जैस्वालला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने हा सामना सहा गडी राखून जिंकला. संघाने १२ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि या हंगामातील आपला सलग चौथा विजय नोंदवला. या विजयामुळे राजस्थानने गुणतालिकेतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे