
अकोला, 15 एप्रिल (हिं.स.)।अकोला शहरातील अगर वेस भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मालवाहू ऑटोत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सकाळपासून या परिसरात फिरताना दिसत होता. त्याच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अकोल्यात सध्या तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जर हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे निष्पन्न झाले, तर राज्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे