शालार्थ घोटाळा : जळगावातील ४८ शिक्षण अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
जळगाव, 15 एप्रिल (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात गाजलेल्या शालार्थ घोटाळ्याप्रकरणी नाशिक एसआयटीने कारवाईचा वेग वाढवत ४८ शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्
शालार्थ घोटाळा : जळगावातील ४८ शिक्षण अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस


जळगाव, 15 एप्रिल (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात गाजलेल्या शालार्थ घोटाळ्याप्रकरणी नाशिक एसआयटीने कारवाईचा वेग वाढवत ४८ शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्या मार्फत देण्यात आल्या आहेत. जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या या नोटिसांमध्ये समावेश असून सर्वांना १८ एप्रिलपर्यंत नाशिक विभागीय मंडळ कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्यात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांची चौकशी केली होती. यावेळी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. या तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या असून जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे उघड झाले आहे. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून कोट्यवधी रुपयांचा पगार लाटण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक एसआयटीकडून संबंधित ४८ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande