

रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) : नेरळ (खांडा) परिसरात सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, तुलसी सेंटर बिल्डिंगच्या गेटसमोर उभा असलेला महावितरणचा वीज खांब कोसळण्याच्या स्थितीत आहे. हा खांब सध्या केवळ एका दोरीच्या आधारावर उभा असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
याशिवाय, संबंधित खांबावरील विद्युत तारा जमिनीच्या अगदी जवळ झुकलेल्या अवस्थेत असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते, तसेच शाळेच्या बसचीही ये-जा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार सूचना देऊनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक मुजम्मिल मणियार यांनी या प्रकरणाची दखल घेत महावितरण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. नादुरुस्त वीज खांब तात्काळ बदलून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.
परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता, संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा, भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)