
रायगड, 16 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील २८ धरणांमध्ये सध्या केवळ ३८.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तीव्र उन्हामुळे पाण्याची पातळी वेगाने घटत आहे. सूर्याच्या वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढले असून येत्या दोन महिन्यांपर्यंत पावसाची प्रतीक्षा असल्याने जलसंकटाची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील २८ धरणांपैकी २० धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यापैकी २ धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण पूर्णपणे कोरडे पडले असून तेथे शून्य टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
तालुकानिहाय पाहता, काही धरणांमध्ये मध्यम साठा असला तरी बहुतांश धरणांची स्थिती चिंताजनक आहे. तळा, रोहा आणि पेण तालुक्यातील काही धरणांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत साठा असला, तरी कर्जत, सुधागड आणि उरण तालुक्यातील धरणांमध्ये साठा झपाट्याने घटला आहे.
एकूणच, उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठ्यावर मोठा परिणाम होत असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनानेही संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)