
अकोला, 16 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात वाढत्या उष्मालाटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनीही सतर्क राहून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी 13 मार्च आणि 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामस्तरावर स्वतंत्र समित्या गठित करण्यात आल्या असून त्यानुसार कामकाज सुरू आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील खासगी शाळा आणि शिकवणी वर्गांमध्ये उष्मालाटीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची तपासणी करण्याचे निर्देश उपायुक्तांना देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागानेही व्यापक तयारी केली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात रुग्णांसाठी 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आयव्ही फ्लुईड्स, ओआरएस, आईसपॅक यांसारख्या आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
कामगारांसाठीही विशेष सूचना देण्यात आल्या असून कामाच्या वेळेत आवश्यक ते बदल करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित आस्थापनांना देण्यात आले आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे
तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
उन्हात वाहन चालवणे शक्यतो टाळावे
लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये
अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा
प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांसोबत नागरिकांनीही दक्षता घेतल्यास उष्माघाताचा धोका टाळता येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे