
पुणे, 16 एप्रिल (हिं.स.) : निस्वार्थ बुद्धी, प्रामाणिकपणा आणि आपुलकीच्या भावनेतूनच खरे सेवाकार्य घडते, आणि हाच सेवाभाव म्हणजेच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले.
नांदोशी (पुणे) येथे ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आनंद भोसले आणि डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. भागवत म्हणाले की, “शिक्षण आणि आरोग्य या जीवनावश्यक गरजा असून त्या प्रत्येकाला सुलभ व परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध व्हायला हव्यात. शासन आपले प्रयत्न करत असले तरी ‘हा देश माझा आहे’ या भावनेतून समाजानेही सेवाकार्यात सहभाग घ्यावा.”
यावेळी लता मंगेशकर आणि आशाताई यांच्या संगीत वारशाचा गौरव करत त्यांनी त्यांच्या स्वरांचे सामर्थ्य चिरंतन राहील, अशी भावना व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगेशकर कुटुंबाच्या सेवाभावाचा गौरव करत सांगितले की, “पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कधीही सेवेचा सौदा केला नाही. ‘अफोर्डेबल केअर’ ही आजची गरज असून ‘लता-आशा’ रुग्णालय त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.” तसेच, परिसरातील रस्ते आणि पाणीपुरवठा सुधारण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत मंगेशकर कुटुंबाची राष्ट्रभक्ती अधोरेखित केली. “या रुग्णालयामुळे हजारो कुटुंबांना आरोग्यसेवा मिळणार आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनंजय केळकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, प्रस्तावित प्रकल्पात आठ प्रमुख संस्था असतील. पहिल्या टप्प्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल. तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने मेडिकल कॉलेज सुरू करण्याची योजना आहे.
या उपक्रमामुळे पुणे परिसरात आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु