उन्हाळी सुट्यांत गर्दीवर नियंत्रणासाठी अमरावती विभागात ५० जादा एसटी बसेस
अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने ५० जादा एसटी बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल ते २६ जून या कालावधीत या बसेस विविध मार्गांवर धाव
उन्हाळी सुट्यांत गर्दीवर नियंत्रणासाठी अमरावती विभागात ५० जादा एसटी बसेस


अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)

उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने ५० जादा एसटी बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल ते २६ जून या कालावधीत या बसेस विविध मार्गांवर धावणार असून त्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्या लागल्यानंतर अनेक कुटुंबे “मामाच्या गावाला जाऊ या” या उत्साहात बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. विशेषतः विद्यार्थी व कुटुंबीय मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास करतात. त्यामुळे बसस्थानकांवर मोठी गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने जादा बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.अमरावती, नागपूर, अकोला, परतवाडा, अकोट, दर्यापूर, यवतमाळ या प्रमुख मार्गांवर फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच अमरावती विभागातील अमरावती, येरूड, परतवाडा, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी आणि चांदूर बाजार या आगारांतूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय चांदूर रेल्वे ते बुलढाणा, हिंगणघाट, नागपूर, संभाजीनगर, तसेच वरूड ते हिंगोली व परभणी या मार्गांवरही अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, आरामदायी आणि सुरक्षित होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अनेक प्रवासी एसटीला प्राधान्य देत असल्याने वाढीव फेऱ्यांमुळे तिकीट मिळण्यात होणारी अडचण कमी होईल आणि प्रवास अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल.“उन्हाळी सुट्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन जवळपास दीड महिन्यांसाठी जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रावलवार यांनी केले आहे.एकूणच, अमरावती विभागाच्या या निर्णयामुळे सुट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande