परतवाडा लैंगिक शोषण व व्हिडिओ व्हायरल प्रकरणात ८ आरोपी अटकेत; सर्व आरोपींचे मोबाईल जप्त
अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)। अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण व आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक केली आहे. या प्र
परतवाडा लैंगिक शोषण व व्हिडिओ व्हायरल प्रकरणात ८ आरोपी अटकेत;  सर्व आरोपींचे मोबाईल जप्त; ऍफाज खानकडून लॅपटॉप, टॅब व हार्डडिस्कही जप्त


अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)।

अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण व आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सोशल मीडियावर काही मुलींचे व एका इसमाचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्याची बाब समोर आली. या अनुषंगाने मुख्य आरोपी अयान अहमद तनविर अहमद (वय १९, रा. परतवाडा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९४, पॉक्सो कायदा कलम ८ व १२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ व ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तपासात ८ पीडित मुलींचे १८ व्हिडिओ व ३९ फोटो आढळले आहेत.तपासादरम्यान व्हिडिओ प्रसारित करण्यात सहभागी असलेले उजेर खान, मो. साद आणि तरबेज खान (सर्व रा. अचलपूर) यांनाही १५ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. पुढील चौकशीत मुख्य आरोपी अयान याने अमरावतीतील मित्राच्या भाड्याच्या घरात मुलींचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याने मानव सुगंधे (रा. आर्वी, सध्या अमरावती) यालाही अटक करण्यात आली. तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या ऍफाज खान, मो. इमरान आणि शे. नावेद (सर्व रा. अचलपूर) यांनाही अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी सर्व आरोपींचे मोबाईल जप्त केले असून ऍफाज खानकडून लॅपटॉप, टॅब व हार्डडिस्कही जप्त करण्यात आले आहेत. या डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित फ्लॅटवर पंचनामा करून घटनास्थळाची तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे.या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून त्यात १० अधिकारी व ३६ कर्मचारी सहभागी आहेत. पोलिसांकडून पीडित मुली व त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशनाद्वारे पुढे येऊन तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध सुरू असून नागरिकांनी कोणतीही माहिती अथवा पुरावे तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande