
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.) - रेल्वे प्रवासादरम्यान ताटातूट झालेल्या मायलेकरांची रेल्वे पोलिसांच्या मध्यस्थीने भेट झाली. भोकर रेल्वे स्थानकावर आई उतरली. मात्र ११ वर्षाचा मुलगा गाडीतच राहिल्याने तो थेट किनवटला पोहोचला. एका महिला प्रवाशाचे प्रसंगावधान आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परतेमुळे या मुलाला सुखरूप आईच्या स्वाधीन केले.
मिरज (जि. सांगली) येथील रहिवासी असलेला अमित रवी गोसावी हा ११ वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करत होता. त्यांना भोकर येथे उतरायचे होते. गाडी भोकर स्थानकावर थांबली असता गर्दीत किंवा घाईगडबडीत आई स्थानकावर उतरली. मात्र अमित गाडीतून उतरू शकला नाही. गाडी पुढे निघून गेल्याने माय-लेकरांची ताटातूट झाली. अमित हा एकटाच किनवट रेल्वे स्थानकावर उतरला.
रेल्वे पोलिस अतिश मोहिते यांनी मुलाचा ताबा घेतला. मुलाला नांदेड येथे नेण्यात आले. तिथे शोध घेतला असता अमितची आई मिळून आली. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी अमितला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. आपला पोटचा गोळा हरवल्याने माउली व्याकुळ झाली होती. २४ तासांच्या आत पोलिसांनी मुलाला सुखरूप समोर आणल्याने आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. लीलाबाई भवरे यांनी दाखवलेली माणुसकी आणि पोलिसांच्या गतिमानतेमुळे घटनेचा सुखांत झाला.
अंबाडी येथील रहिवासी लीलाबाई भवरे यांच्या मागे जाऊ लागला. लीलाबाई यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुलाला तात्काळ किनवट पोलिस ठाण्यात नेले. तेव्हा किनवटचे पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी तत्परता दाखवत हालचाली सुरू करीत रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis