

अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) परतवाडा येथे तरुणींचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद अयान याला पोलिसांनी अटक केली असून तपासादरम्यान गंभीर बाबी उघडकीस येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित तरुणींना आमिष दाखवून कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये बोलावून नेत असे. त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या कृत्यासाठी आरोपीने आपल्या एका साथीदाराची मदत घेतल्याचेही समोर आले आहे. संबंधित साथीदाराला प्रत्येकी सुमारे पाचशे रुपये देऊन मदत घेतली जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.दरम्यान, पोलिसांनी संशयित फ्लॅटवर छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक तरुणींना आणले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणाचा व्याप्ती मोठा असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करत सखोल चौकशी केली आहे.या घटनेमुळे अमरावतीसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध सुरू केला असून तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे तपासाची गती वाढवण्यात आली आहे.पोलिस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास निष्पक्षपणे आणि जलदगतीने करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी