
सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। अराध्या फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सोलापूरमध्ये 'सोलापूर फॅशन आयकॉन सीझन-३' आणि 'सिग्नेचर ऑनर्स अवॉर्ड्स २०२६' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी, अक्कलकोट रोड येथील पद्मावती कन्व्हेन्शन्स येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
हा केवळ एक फॅशन शो नसून, यातून जमा होणारा निधी उच्च-जोखमीच्या गर्भवती महिला आणि अकाली जन्मलेल्या (Premature) किंवा कमी वजनाच्या बालकांच्या मोफत उपचारांसाठी वापरला जाणार आहे. समाजातील गरजू बालकांना जीवनदान मिळावे, या उदात्त हेतूने अराध्या फाउंडेशनने या 'चॅरिटी फॅशन शो'चे आयोजन केले आहे.
यावेळी 'सिग्नेचर ऑनर्स अवॉर्ड्स'च्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने यशस्वी उद्योजक व व्यावसायिक, नावाजलेले कलाकार, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी, निष्ठावंत समाजसेवक यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मराठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अभिनेते हर्षद अतकरी, अभिनेत्री शर्वरी जोग आणि बाल कलाकार अराध्या येल्डी यांचा समावेश आहे. त्यांच्या उपस्थितीत स्पर्धकांना आणि उपस्थितांना एक अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड