
रत्नागिरी, 16 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरीत येत्या रविवारी, दि. १९ एप्रिल रोजी अक्षरबाग बालग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
आजच्या डिजिटल युगात मुलांमधील मोबाइल आणि स्क्रीनचे वाढते आकर्षण पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. वाढत्या स्क्रीन वापरामुळे मुलांचा 'ॲटेंशन स्पॅन' (एकाग्रता) कमी होत असतानाच, त्यांना पुस्तकांच्या रंगीबेरंगी आणि अद्भुत विश्वाशी जोडण्यासाठी रत्नागिरीत एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 'आनंदालय एक्स्पिरिअन्शल होमस्कूल'तर्फे खास मुलांसाठी 'अक्षरबाग' या नावीन्यपूर्ण बालग्रंथालयाची सुरुवात करण्यात येत आहे. या ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा येत्या १९ एप्रिल २०२६ रोजी, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे.
मुलांमधील ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी 'अक्षरबाग'मध्ये दीड वर्षांपासून ते १४ वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी वैविध्यपूर्ण पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केवळ पुस्तक वाचनच नव्हे, तर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी येथे 'स्ट्रक्चर्ड रीडिंग प्रोग्राम' आणि विविध वाचनपूरक उपक्रमही राबवले जाणार आहेत. मोबाइलच्या आभासी जगापासून मुलांना दूर नेऊन अक्षरांच्या बागेत रमवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे व नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे टेक्निकल डायरेक्टर रामबाबू संका उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी १०:३० वाजता, मराठा भवन मंगल कार्यालयात उद्घाटन होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी