
नाशिक, 16 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त दि. १ मे २०२६ रोजी पोलिस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मुख्य ध्वजारोहण समारंभाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात 1 मे महाराष्ट्र दिन मुख्य ध्वजारोहण समारंभाच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, तहसीलदार (सामान्य प्रशासन) प्रदिप वर्पे, तहसीलदार (निवडणूक) राजेंद्र वाकचौरे, धान्य वितरण अधिकारी शामली धपाडे, जिल्हा सूचना अधिकारी विक्रम नैन, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड, महानगरपालिका उद्यान विभागाचे किरण बोडके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचा समारंभ, राज्याच्या प्रगतीचे व विकासदृष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे कार्यक्रम भव्य, प्रेरणादायी व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने सोपविलेली जबाबदारी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावी. सर्व विभागांनी “विकसित महाराष्ट्र” या संकल्पने अंतर्गत केलेल्या कामांची तसेच शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उल्लेखनीय उपक्रमांची सविस्तर माहिती 21 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. सांस्कृतिक कार्यक्रम दर्जेदार व विषयाधारित ठेवावेत.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या एनडीआरएफ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या धर्तीवर यावेळी विज्ञान विषयक प्रदर्शनाचे आयोजन करावे. यात जिल्ह्यातील शासकीय विभाग, तांत्रिक संस्था व महाविद्यालयांचा सहभाग सुनिश्चित करावा. कार्यक्रमस्थळी सुरक्षा, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, नाश्ता, पिण्याचे पाणी यांची योग्य व्यवस्था करावी. कवायतीत एकूण ११ पथकांचा समावेश असावा. यात नवीन वाहनांसह सर्व पथकांनी शिस्त, समन्वय व आकर्षक सादरीकरणावर भर द्यावा. मंडप, व्यासपीठ, आसनव्यवस्था, ध्वनीव्यवस्था चोख ठेवावी. आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्पर ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV