
नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.) -
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे 'आत्मे' दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक, धक्कादायक दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र अंनिस तीव्र निषेध करीत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ज्या सामाजिक न्याय विभागाने भारतात पहिला असा जादूटोणा विरोधी कायदा पारित केला. त्याच विभागाचे मंत्री त्याच कायद्याची मूल्ये पायदळी तुडवणारी, लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढवणारी, भय निर्माण करणारी विधाने करतात हे देशातील प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्याचा आणि संत-समाज सुधारकांचा अवमान करणारे आहे.
त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून महाराष्ट्र अंनिस त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे.
महाराष्ट्र अंनिस आवाहन करीत आहे की, महापालिकेची ही कथित आत्म्यांचे वास्तव्य असलेली इमारत या मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी अंनिसकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत व्यवस्थित सामाजिक कामे करून, विविध उपक्रम करून दाखवू. आत्मा नावाची गोष्ट अजून आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध झालेली नाही.
तरी महापालिकेसारख्या सार्वजनिक संस्थांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. यामुळे समाजात भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढीस लागते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे असे आहे की, कोणतीही घटना तर्क, विज्ञान आणि पुराव्यांच्या आधारे समजून घेतली पाहिजे. भूत-प्रेत, आत्मा यांसारख्या संकल्पना या मानवनिर्मित आहेत, वास्तवात नाहीत. समाजाने अंधश्रद्धेऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हजारो भोंदू बुवाबाबा, मांत्रिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, काहींना या गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत. त्याच मंत्रालयाचे मंत्री असे अवैज्ञानिक दावे करतात, सर्वथा चुकीचे आहे. संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधाने करावीत. अशा आशयाचे पत्रक राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव डॉ. टि.आर.गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आदींनी प्रसिद्ध केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV