
नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)।
नांदेड शहरात दोन टोळके आमनेसामने येऊन झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला होता. तर तिसऱ्या जखमीची विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात तैनात सुरक्षारक्षक व पोलिसांच्या साक्षीने हत्या झाली होती. सदर घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच तेथे कार्यरत दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. रुग्णालय प्रशासनानेही मेस्कोकडे सुरक्षेसंदर्भातील त्रुटीचा अहवाल मागविला होता. सुरक्षा रक्षकांवर कारवाई नाही या प्रकरणी कुठलीही कारवाई मात्र झाली नाही.
विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केवळ नांदेडच नव्हे तर शेजारील हिंगोली, परभणी, यवतमाळ व अगदी तेलंगणातूनही रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. नांदेड शहरातील जागा अपुरी पडत असल्याने काही वर्षापूर्वी सदर महाविद्यालय व रुग्णालयाचे विष्णुपुरी येथील दोनशे एकर जागेत उभारण्यात आलेल्या भव्य इमारतीत स्थलांतर केले होते. त्यामुळे
अधिकचे बेड उपलब्ध झाले असून रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा ओढा वाढला आहे. अशा स्थितीत येथील सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसेस कॉपोरशन (मेस्को) कडे सोपवली असून जवळपास अडीचशे जणांची नियुक्ती केलेली आहे. मात्र, ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे ते सुरक्षा सोडून नको त्या कामात व्यस्त असतात.
ग्रामीण भागातून आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची अडवणूक करण्यापलीकडे सदर यंत्रणेला काम उरले नाही. घटनेला दहा दिवस लोटले तरी अद्याप या प्रकरणी कुठलीही कारवाई झाली नाही.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis