सोलापूर - भगवान परशुराम जयंतीनिमित्त सोमवारी आर्टिफिशियल हत्तीवरुन परशुराम मूर्तीची मिरवणूक
सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर येथील भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्यावतीने भगवान परशुराम जयंती निमित्त सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी सोलापूर शहरातून भगवान परशुराम यांच्या मूर्तीची आर्टिफिशियल हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तत्पूर
parshu


सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर येथील भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्यावतीने भगवान परशुराम जयंती निमित्त सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी सोलापूर शहरातून भगवान परशुराम यांच्या मूर्तीची आर्टिफिशियल हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंती आहे त्या दिवशी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जुने विठ्ठल मंदिरात भगवान परशुराम मूर्तींचे पूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सव समिती अध्यक्ष आनंद खंडेलवाल यांनी दिली आहे.

जुने विठ्ठल मंदिरात रविवारी सायंकाळी ६ वाजता वेदमूर्तींच्या उपस्थितीत आणि वेद मंत्रांच्या घोषात भगवान परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. यावेळी वेद प्रतिष्ठानचे वेदमूर्ती ऋषिकेश दादेगावकर, वेदमूर्ती गोविंद गवई आणि त्यांचे सहकारी वेदमंत्रांचे पठण करणार आहेत. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व समाजातील नागरिकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. तसेच त्याच ठिकाणी दर्शनानंतर प्रसाद म्हणून कैरीची डाळ आणि पन्हे वाटप करण्यात येणार आहे.

सोमवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दत्त चौकापासून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक तेथून नवी पेठ, मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक मार्गे चार पुतळा येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी सायंकाळी सहा तीस वाजता भगवान परशुराम यांच्या मूर्तीची वेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश दादेगावकर आणि गोविंद गवई यांच्या नेतृत्वाखाली ५१ पुरोहितांच्या मंत्र घोषात पूजन करून मिरवणुकीचा समारोप करण्यात येईल.

या मिरवणुकीत आर्टिफिशियल हत्तीवरील अंबारी मध्ये भगवान परशुराम यांची मूर्ती असेल. १०० कलशधारी महिलांचे पथक, अखंड विष्णू सहस्त्रनाम म्हणणारे मंडळ सहभागी होईल. याशिवाय परशुरामापर्यतचे सर्व अवतारातील वेशभूषा केलेले दिल्ली येथील कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. याशिवाय या मिरवणुकीत सुमारे 200 ते 250 युवक युवतींचे लेझीम पथक, महिलांची भजनी मंडळ आणि जवळपास 600 नागरिक एकाच पोशाखात मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. याशिवाय या मिरवणुकीत नाट्य, संगीत, साहित्य, कला, डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक, राजकीय पक्ष, विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजातील सर्व क्षेत्रातील अनेक व्यक्ती सहभागी होणार असून भव्य दिव्य अशी ही मिरवणूक निघणार आहे, अशी माहिती या जन्मोत्सवाच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या स्वागत समितीचे अध्यक्ष मोहनराव दाते यांनी दिली.

तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी सोमवार २० एप्रिल रोजी दुपारी चार वाजता निघणाऱ्या भगवान परशुराम जन्मोत्सव मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष आनंद खंडेलवाल आणि महिला अध्यक्ष अश्विनी जोशी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला नितीन कुलकर्णी, रमण कुलकर्णी, राम तडवळकर, प्रा. मोहिनी पतकी, दत्ता आराध्ये , दिपक बाजपेयी, वामन कुलकर्णी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande