नांदेड - परशुराम जयंतीपूर्वी परशुराम चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। १९ एप्रिल रोजी होणाऱ्या परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परशुराम चौकाची दयनीय अवस्था समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ब्राह्मण समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या या चौकात दरवर्षी मोठ्या प
नांदेड - परशुराम जयंतीपूर्वी परशुराम चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी


नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। १९ एप्रिल रोजी होणाऱ्या परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परशुराम चौकाची दयनीय अवस्था समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ब्राह्मण समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या या चौकात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते; मात्र यंदा जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही चौकात स्वच्छता, देखभाल व सुशोभीकरणाचा अभाव दिसून येत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी मनपावर निष्क्रयतेचा आरोप करत तातडीने कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. चौक परिसरात कचरा, तुटलेली रचना व अस्वच्छता स्पष्टपणे दिसून येत असल्याने जयंतीच्या कार्यक्रमावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

या संदर्भात मनपा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप लातूरकर यांनी केला. परशुराम जयंती हा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. अशा वेळी चौकाची दुरवस्था ही प्रशासनाच्या उदासीनतेचे द्योतक असल्याची टीका करण्यात आली. जयंतीपूर्वी तातडीने स्वच्छता, दुरुस्ती व सुशोभीकरण करून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande