20 एप्रिलपर्यंत जात वैधता मोहिम; विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
रायगड, 16 एप्रिल (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, 20 एप्रिलपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेतील तसेच पुढील व्यावसायिक शिक्षणास
Caste validity campaign till April 20; Students seize the opportunity


रायगड, 16 एप्रिल (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, 20 एप्रिलपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेतील तसेच पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्वरित अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य जयंत चाचरकर यांनी केले आहे.

अकरावी-बारावी विज्ञान शाखा, अभियांत्रिकी पदविका तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याची समस्या वारंवार समोर येत असते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात व काही वेळा संधीपासून वंचित राहावे लागते.

ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेत विशेष मोहिम राबवली आहे. 14 एप्रिलपासून सुरू झालेली ही मोहीम 20 एप्रिलपर्यंत चालणार असून, विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी आधीच जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्यांनी त्वरित जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी जिल्हा पडताळणी समिती कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक त्रुटी पूर्ण कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत मोठा आधार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande