
छत्रपती संभाजीनगर , 16 एप्रिल, (हिं.स.)। काँग्रेसने आता कंबर कसली असून, जिल्ह्यात 'संघटन सृजन अभियाना' अंतर्गत बैठकांचा धडाका लावला आहे. पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि खुलताबाद येथे झालेल्या या बैठकांमधून आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले असून, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. नवा
पैठण येथील बैठकीत प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. 'काँग्रेसची विचारधारा मानणारे आणि निष्ठेने काम करणाऱ्यांनाच पदे मिळतील, केवळ नावापुरत्या कार्यकर्त्यांना स्थान नाही.' काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस प्रभारी विवेक बंसल, प्रवक्ता अतुल लोंढे, खा. डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
माजी मंत्री अनिल पटेल यांनी गावागावांत पक्ष पुन्हा उभा करण्याची हाक दिली.
येथील फुलंब्री शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत प्रभारी विवेक बंसल यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा थेट आढावा घेतला. निवडणुकीतील पराभवाची कारणे, तिकीट वाटपातील त्रुटी आणि स्थानिक समीकरणांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी पुढील रणनीती आखली. खुलताबादेत रविवारी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक पार पडली. यावेळी गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी ठोस नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis