काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाला’ वेग : पक्षाचे केंद्रीय निरीक्षक 17 ते 19 एप्रिल दरम्यान परभणीत
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। देशभरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाने हाती घेतलेले ‘संघटन सृजन अभियान’ सध्या वेगाने राबवले जात असून त्याअंतर्गत महाराष्ट्रात व्यापक संघटनात्मक पुनर्रचनेला सुरुवात झाली आहे. राज्यात
काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाला’ वेग : पक्षाचे केंद्रीय निरीक्षक 17 ते 19 एप्रिल दरम्यान परभणीत


परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।

देशभरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाने हाती घेतलेले ‘संघटन सृजन अभियान’ सध्या वेगाने राबवले जात असून त्याअंतर्गत महाराष्ट्रात व्यापक संघटनात्मक पुनर्रचनेला सुरुवात झाली आहे. राज्यात 37 केंद्रीय निरीक्षक आणि 183 वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यातही या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जिल्ह्यासाठी नियुक्त केंद्रीय निरीक्षक अझमतुल्लाह हुसैनी (अध्यक्ष, वक्फ मंडळ, तेलंगणा), जितेंद्र देहाडे आणि दादासाहेब मुंढे हे तिसर्या टप्प्यांतर्गत जिल्हा दौर्यावर आहेत. जाहीर कार्यक्रमानुसार, 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पूर्णा येथे बैठक व संवाद कार्यक्रम होणार आहे. 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिंतूर येथे, तर सायंकाळी 4 वाजता मानवत येथे बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. दौर्याच्या अंतिम दिवशी 19 एप्रिल रोजी परभणी शहरात सकाळी 10 वाजता आणि दुपारी 3 वाजता जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक तसेच वरिष्ठ नेत्यांशी वैयक्तिक संवाद साधला जाणार आहे.

या बैठकीत स्थानिक संघटनेची सद्यस्थिती, कार्यकर्त्यांची मते व सूचना जाणून घेतल्या जाणार असून त्यानुसार जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष व तालुका अध्यक्ष पदांसाठी योग्य नेतृत्वाची निवड केली जाणार आहे. त्याचा सविस्तर अहवाल अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे सादर करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेसची संघटना अधिक सक्षम, कार्यक्षम व जनतेशी जोडलेली होईल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande