
परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामीजी यांचे कृपापात्र शिष्य आणि त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाडाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर पूज्य स्वामी श्री शिवगिरिजी महाराज यांच्या मधुर वाणीतून संगीतमय प्रवचन गुरुवारी, २३ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे.
शिर्डीचे संत आणि श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचे शिष्य श्री साईबाबा यांच्या सेलू (जि.परभणी) येथील महेशनगरातील मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. सौ.पार्वती आणि शंकरराव बाबूराव हेलसकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन तसेच विजया आणि दत्तात्रेय काशीनाथ गोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त नारायण हेलसकर आणि बाबासाहेब हेलसकर परिवारातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचन आणि सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मीरा व नारायण हेलसकर, स्वाती व बाबासाहेब हेलसकर, आश्विनी व अजित गोरे, छाया व दिलीपराव हलगे आणि अर्चना व अमोल झोटिंग तसेच हेलसकर परिवार आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रंथ व लेखन साहित्य तुला
सहस्रामृत सोहळ्यात जागतिक पुस्तक दिनानिमित्त श्री शंकरराव हेलसकर आणि दत्तात्रय गोरे यांची ग्रंथ व शाळापयोगी लेखन साहित्य तुला करण्यात येणार आहे. साहित्यात अधिक भर घालून सामाजिक बांधिलकी जपत हे साहित्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे, असे संयोजकांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis