
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृहात उत्साहात पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली.
ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्यचित्रात आमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने या अभियानाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून आरोग्य केवळ उपचारांपुरते मर्यादित न ठेवता प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता, पोषण आणि जनजागृती यांचा समन्वय साधत गावोगावी आरोग्यक्रांती घडवण्यावर भर देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील तब्बल आठशेहून अधिक गावे या अभियानात सहभागी होणार असल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी उभारी मिळणार आहे.
जिल्ह्यात सध्या ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २१६ उपकेंद्रांचे जाळे कार्यरत असून त्यासोबत ६ आयुर्वेदिक व युनानी रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व सामुदायिक आरोग्य केंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे. या सर्व यंत्रणांच्या समन्वयातून गावपातळीवर विविध आरोग्य उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा व ग्रामपातळीवर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार असून आरोग्य विभागाच्या नेतृत्वाखाली कृती आराखडा राबविण्यात येणार आहे. गावपातळीवरील समित्या आरोग्य निर्देशांकांचे मूल्यमापन करून प्रत्यक्ष अंमलबजावणीस दिशा देतील.
तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक गावाचे स्वच्छता, लसीकरण, मातृ-शिशु आरोग्य, कुपोषण निर्मूलन, पाणी गुणवत्ता व रोगनियंत्रण या निकषांवर मूल्यमापन करण्यात येणार आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून सन्मानित करण्यात येणार असून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्था, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या माध्यमातून गावपातळीवरील अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार आहे. ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील हे पुढील महत्त्वाचे पाऊल ठरणार असून यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीचा पाया मजबूत होईल, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेत पूर्णा व सेलू तालुक्यांकडून सूक्ष्म कृती आराखडा सादर करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, मूल्यांकन व नियंत्रण अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एनएचएम, जिल्हास्तरीय पीएचएन तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis