
रायगड, 16 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचा समारोप १६ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. सकाळी ११ वाजता ३१ व्या व्याख्यानपुष्पाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत तसेच महान व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनिश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव डॉ. अमित शेष यांनी प्रमुख व्याख्याते डॉ. राजेश रगडे यांचे स्वागत केले. यावेळी अधिष्ठाता एस. एल. नलबलवार, प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे, डॉ. विकास सरगडे, डॉ. गणेश वरखडे आणि समिती अध्यक्ष अशोक रामा पवार उपस्थित होते.
प्रमुख व्याख्याते डॉ. राजेश रगडे यांनी “तंत्रज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. बाबासाहेबांचे विचार जागतिक स्तरावर कसे पोहोचले आणि त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी कसा केला, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अमित शेष यांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)