
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन जन्मभूमी महू येथे भीमजयंतीचा सोहळा उत्साहात पार पडला. मध्य प्रदेश शासन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय भीम जयंती समारंभात समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘भीम रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. संबोधी अकादमी, महाराष्ट्रचे अध्यक्ष असलेल्या डॉ. हत्तीअंबीरे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भदंत डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी भूषविले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची लाभली. यावेळी मेमोरियल सोसायटीचे सचिव राजेश वानखेडे यांनी डॉ. हत्तीअंबीरे यांच्या कार्याचा आढावा उपस्थित मान्यवरांसमोर मांडला.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, केंद्रीय मंत्री तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान होत असल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
‘भीम रत्न’ पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. आंबेडकरांच्या संदेशाचा समाजात प्रसार करणाऱ्या कार्याची पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांच्या या यशाबद्दल विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व संबोधी अकादमी परिवाराच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis