
नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)।
बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केली. दरम्यान, रुग्णालयात लवकरच डायलेसिस सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राजपूत यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयाचे नूतन वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राजपूत यांनी नगरपरिषद कार्यालयास भेट दिली असता, नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील विद्यमान सुविधा, रुग्णसेवा, मनुष्यबळ तसेच भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले की, रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. योगेश राजपूत यांनी सांगितले की, उपजिल्हा रुग्णालयात लवकरच डायलेसिस सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच उपचारासाठी बाहेरच्या शहरात जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis