
मुंबई, 16 एप्रिल (हिं.स.)। : ऊर्जा विभागातील भरती प्रक्रिया व प्रतीक्षा यादी संदर्भातील आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी घेतला. भरती प्रक्रियेबाबत आवश्यक सुधारणा करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
एमएसईबी होल्डिंग कंपनी कार्यालयात झालेल्या या बैठकीस महानिर्मितीचे कार्यकारी संचालक नितीन वाघ, महावितरणचे कार्यकारी संचालक राजेंद्र पवार, महापारेषणच्या कार्यकारी संचालक सुचिता भिकाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, भरती प्रक्रियेच्या अंतर्गत निकाल आणि प्रतिक्षा यादीबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. तिन्ही कंपन्यांच्या भरती धोरणामध्ये एकसमानता (युनिफॉर्मिटी) आणण्यात यावी. दिव्यांग, एसइबीसी/ईडब्ल्यूएस तसेच प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यात यावी आणि आयबीपीएस कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबविताना उमेदवारांचे गुणांसह निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात यावेत.
तसेच ऊर्जा विभागातील रिक्त पदांचा नियमित आढावा घेऊन त्यानुसार विभागातील भरती प्रक्रिया राबवावी अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर