पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यम शाळा अनधिकृत
पुणे, 16 एप्रिल (हिं.स.) - २०२६ - सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० खाजगी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. संबंधित शाळांना यापू
school


पुणे, 16 एप्रिल (हिं.स.) - २०२६ - सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० खाजगी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. संबंधित शाळांना यापूर्वीच शाळा बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली असतानाही या शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सर्व पालकांना स्पष्टपणे सूचित करण्यात येत आहे की,त्यांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत शाळांमध्ये करू नये. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर व भविष्यातील शैक्षणिक मान्यतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असून,अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश दिल्यास होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संबंधित पालक स्वतः जबाबदार राहतील,याची नोंद घ्यावी.

तसेच,संबंधित सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना या निवेदनाद्वारे स्पष्ट इशारा देण्यात येत आहे की,शासनाची आवश्यक परवानगी प्राप्त केल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत. अन्यथा,अनधिकृतपणे शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यास महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयांनुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे,अशी माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली आहे.

तरी पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून केवळ शासनमान्य व अधिकृत शाळांमध्येच प्रवेश घ्यावा,असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande