मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल बिघडवून एक्सप्रेसमध्ये दरोडा
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। रेल्वे सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून एक्सप्रेस गाडी थांबवून प्रवाशांची लूट केल्याची गंभीर घटना मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ उघडकीस आली आहे. गुरुवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गाडी क्र
मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल बिघडवून एक्सप्रेसमध्ये दरोडा


परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।

रेल्वे सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून एक्सप्रेस गाडी थांबवून प्रवाशांची लूट केल्याची गंभीर घटना मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ उघडकीस आली आहे. गुरुवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

गाडी क्रमांक 17026 काकीनाडा-साईनगर एक्सप्रेस मानवत रोड स्थानकाच्या दिशेने येत असताना सिग्नल न मिळाल्याने ती पुलाजवळ थांबली. याच वेळी काही अज्ञात दरोडेखोरांनी गाडीत प्रवेश करून प्रवाशांना चाकू व तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली. विशेषतः जनरल व एस-4 डब्यातील प्रवाशांना लक्ष्य करण्यात आले. या घटनेत महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू हिसकावून नेण्यात आल्या. सुमारे सहा जणांच्या टोळीने हा दरोडा टाकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यानंतर रेल्वे अधिकार्यांनी सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे संबंधित एक्सप्रेस गाडी सुमारे चाळीस मिनिटे उशिराने मानवत रोड स्थानकात दाखल झाली. या प्रकरणी रेल्वे पोलीसांकडून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande