
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)। जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या फर्दापूर गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या फर्दापूरकरांची तहान भागली असून, गावात पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
फर्दापूरच्या पाणीटंचाईप्रकरणी इद्रीस मुलतानी यांनी मुंबईत पाणीपुरवठा, ऊर्जा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. यानंतर बोर्डीकरांनी तातडीने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला.
यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने फर्दापूरमध्ये धाव घेतली. तोंडापूर धरणातून येणारी पाइपलाइन आणि पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारींची बारकाईने पाहणी करण्यात आली. जि. प. अध्यक्ष अविनाश गलांडे, उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल व जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत तिसऱ्या दिवशी रात्री तोंडापूर धरणातून येणाऱ्या पाइपलाइनचे काम पूर्ण केले. त्यानंतर संपूर्ण फर्दापूर गावात पाणी सोडण्यात आले. ग्रामस्थांनी पाणी आल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis