
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील एक साधी, बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली गृहिणी रुपाली संदीप देशमुख. घर आणि कुटुंब यापुरतेच मर्यादित आयुष्य असताना, त्यांच्या मनात मात्र काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. याच जिद्दीला दिशा मिळाली ती शासनाच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती” योजनेमुळे. या योजनेची माहिती मिळताच रुपालीताईंनी धाडसाने पुढाकार घेतला.
जिल्हा उद्योग केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत बायोकोल प्रकल्पासाठी कर्ज प्रस्ताव सादर केला आणि त्यांना तब्बल 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या संधीचं सोनं करत त्यांनी परभणी तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे “श्रीनिवास बायोकोल इंडस्ट्रिज” उभी केली. शेतातील काडीकचरा, भुस्सा आणि पिकांचे उर्वरित अवशेष यापासून बायोकोल तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम ठरला. आज त्या अनेक कपंन्यांना बायोकोल पुरवतात. कोविडच्या अतिशय संकटाच्या काळात देशातील नामांकित औषधी कंपन्यांनाही त्यांनी बायोकोलचा पुरवठा केला. महत्वाचे म्हणजे त्यांचा हा उद्योग पूर्णत: सोलरवर आहे.
आज त्यांच्या उद्योगामुळे ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार मिळाला. वाया जाणाऱ्या शेती अवशेषांना योग्य किंमत मिळू लागली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. उद्योजिका म्हणून रुपाली देशमुख यांनी आत्मविश्वासाने स्वतःची ओळख निर्माण केली. वाकोडी (ता. महागाव, जि. यवतमाळ) हे त्यांचे माहेर असून परभणी हे त्यांचे सासर आहे.
आज त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपये असून, त्यांना दरमहा सुमारे 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. एक साधी गृहिणी ते यशस्वी उद्योजिका, हा प्रवास सोपा नव्हता, पण जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर रुपालीताईंनी तो प्रवास यशस्वी करून दाखवला. ही यशकथा केवळ प्रेरणादायी नाही, तर प्रत्येक महिलेसाठी एक संदेश आहे, स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवा, संधी ओळखा आणि कृती करा… यश तुमचंच असेल……!
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis