
नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)। राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थीसाठी एक महत्त्वाची; पण चिंताजनक बातमी समोर आली आहे. शास न स्तरावर उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरातील घरकुल योजनेचे हप्ते रखडले असून, पुढील किमान एक महिना निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत स्पर्श प्रणालीअंतर्गत होणारी फंड ट्रांसफर यंत्रणा प्रक्रिया सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे ज्या लाभार्थीच्या घरांची कामे प्रगतीपथावर आहेत किंवा पूर्ण झाली आहेत, त्यांच्या बँक खात्यात जमा होणारा पुढील हप्ता थांबला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे निधी वितरणात अडथळा निर्माण झाला असून, परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी
काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. निधी उपलब्ध होताच आणि हप्ते वितरीत होण्यास सुरवात होताच लाभार्थीना तातडीने कळवण्यात येईल. तांत्रिक बाबींमुळे पुढील एक महिना निधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. तोपर्यंत लाभार्थीना संयम बाळगावा लागणार आहे. तांत्रिक कारणास्तव हे काम थांबलेले असल्याने लाभार्थीनी कार्यालयात अनावश्यक गर्दी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरकुल योजनेच्या हप्त्यांवर अनेक कुटुंबांच्या घरांचे स्वप्न अवलंबून असते. मात्र, आता या तांत्रिक पेचामुळे लाभार्थीना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis