
कोल्हापूर, 16 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हा शासकीय ठेकेदार संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू असून थकीत देणी तात्काळ मिळावीत या मागणीसाठी ठेकेदारांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन अधिक तीव्र केले आहे. शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व कामे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.
करवीर तालुका कॉन्ट्रक्टर असोसिएशनच्या पुढाकाराने आज ठेकेदारांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. एस्टिमेट प्लॅनऐवजी टाळ-मृदुंग हाती घेत भजन आणि पोवाड्यांच्या माध्यमातून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. “झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी” हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी ठेकेदारांनी सरकारवर गंभीर आरोप करत, “गेंड्याची कातडी पांघरून सत्तेवर बसलेल्या कारभाऱ्यांनी ठेकेदारांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आहे,” अशी टीका केली. जोपर्यंत थकीत देणींसाठी 100 टक्के निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला.
तसेच, शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील सर्व कामे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असून, जनतेत सरकारविरोधात असंतोष वाढू शकतो, असे आंदोलकांनी नमूद केले.
दरम्यान, या आंदोलनाला जिल्हा परिषद पदाधिकारी तसेच मराठा महासंघ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी ठेकेदार संघटनेने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar