‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा - हिंदु जनजागृती समिती
मुंबई, 16 एप्रिल (हिं.स.) - गोरेगाव येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा झालेला मृत्यू आणि राज्यात फोफावलेला अमली पदार्थांचा व्यापार, हे महाराष्ट्र ''उडता पंजाब'' होण्याच्या दिशेने चालल्याचे लक्षण आहे. त्यामुळे सरकारने आता वेळ न घालवता तातडीन
‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा - हिंदु जनजागृती समिती


मुंबई, 16 एप्रिल (हिं.स.) - गोरेगाव येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा झालेला मृत्यू आणि राज्यात फोफावलेला अमली पदार्थांचा व्यापार, हे महाराष्ट्र 'उडता पंजाब' होण्याच्या दिशेने चालल्याचे लक्षण आहे. त्यामुळे सरकारने आता वेळ न घालवता तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवावे; तसेच 'सनबर्न', म्युझिक कॉन्सर्ट, रेव्हा पार्ट्या आदी भारतीय संस्कृतीविरोधी कार्यक्रमांमुळे तरुण पिढीचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याने, याला जबाबदार असणारे आयोजक तथा प्रशासकीय यंत्रणा यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. समितीने यापूर्वीही मुंबई आणि गोवा येथील ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला तीव्र विरोध केला होता, कारण अशा कार्यक्रमांतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा होणारी सामाजिक आणि राष्ट्रीय हानी अधिक गंभीर आहे.

अंमली पदार्थांचे हे पसरलेले जाळे केवळ व्यसनाधीनतेपुरते मर्यादित नसून देशाला पोखरण्याचे एक मोठे युद्धच आहे. ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२५ मध्ये २००० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त होणे आणि नाशिक, मुंबई-साताऱ्यासारख्या शहरांत ड्रग्जचे कारखाने सापडणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर आव्हान आहे. भारत हा ‘गोल्डन क्रेसेंट’ आणि ‘गोल्डन ट्रँगल’च्या मध्यभागी असल्याने तस्करांकडून देशाचा वापर ‘ट्रान्झिट रूट’ म्हणून केला जात आहे. तरी सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केवळ तस्करांच्याच नव्हे, तर अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांच्या मुसक्या आवळून तरुण पिढीला या विळख्यातून वाचवावे, असे आवाहनही केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande