
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।
पाथरी रस्त्यावरील आर. पी. हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर तसेच मराठवाड्यातील पहिले स्पाइनल डिकॉम्प्रेशन युनिटचे उद्घाटन पार पडले.
या नव्या सुविधेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी, डॉ. विवेक नावंदर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी तसेच रामराव डोंगरे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले की, या अत्याधुनिक सुविधेमुळे परभणीसह मराठवाडा विभागातील रुग्णांना दर्जेदार व प्रभावी उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. यावेळी डॉ. प्रमोद शिंदे यांनी नव्या युनिटविषयी माहिती देताना स्पष्ट केले की, स्पाइनल डिकॉम्प्रेशन युनिट हे मराठवाड्यातील पहिले असून, पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या, डिस्क प्रोलॅप्स, नर्व्ह कॉम्प्रेशन, सायटिका यांसारख्या आजारांवर नॉन-शस्त्रक्रियात्मक आधुनिक उपचार येथे दिले जाणार आहेत. तसेच फिजिओथेरपी सेंटरमध्ये अत्याधुनिक उपकरणे, व्यायाम सुविधा आणि तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट्सची टीम रुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis