
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)।
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धेला झाल्टा फाटा, धुळे-सोलापूर महामार्ग येथे उत्साहात सुरवात झाली.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, एआययूचे डॉ. दीपक कुमार सिंग, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव संजय साठे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे धर्मेंद्र लांबा, तर एमजीएम विद्यापीठाकडून कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. जॉन चेल्लादुराई, नितीन घोरपडे, डॉ. दिनेश वंजारे, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या दोन्ही संस्था या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळत आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, कर्नाटक, राजस्थान, हरयाणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मणिपूर,
उत्तर प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, उत्तराखंड आदी राज्यांतील ७४ विद्यापीठांतील सुमारे ३५० खेळाडू सहभागी झाले आहेत. बुधवारी ४० किमी वैयक्तिक टाइम ट्रायल पुरुष आणि २० किमी वैयक्तिक टाइम ट्रायल महिला गटातील स्पर्धा झाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis