
परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र, शिवाजी नगर (दिंडोरी प्रणित) शाखा क्र. 1, वसमत रोड, येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफिसर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, क्षेत्र अधिकारी, नर्सिंग, वॉर्ड बॉय, रिसेप्शनिस्ट, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, ॲग्रीकल्चर ऑफिसर, ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, विमा सखी, लाईफ मित्र आदी पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यास एकूण 155 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली. त्यापैकी 45 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संप्रिया राहुल पाटील, डॉ. रामेश्वर नाईक तसेच श्री स्वामी समर्थ सेवामार्ग मराठवाडा प्रतिनिधी संदीप भाऊ देशमुख उपस्थित होते. तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे व मार्गदर्शन अधिकारी मदन शिंदे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis