
कोल्हापूर, 16 एप्रिल (हिं.स.) - भगवान परशुराम जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर आणि सांगलीत ब्राह्मण समाजाच्या वतीने १९ एप्रिलला भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे. ही शोभयात्रा दुपारी ३ वाजता सांगलीतील गणपति मंदिर येथून प्रारंभ होईल आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन त्याचा समारोप विश्रामबाग येथील विलिंग्डन महाविद्यालयाजवळील ‘आय.टी. पार्क’ येथे होईल. वाटेत या यात्रेचे मान्यवर स्वागत करतील. विलिंग्डन महाविद्यालयाजवळ सायंकाळी साडेसहा वाजता जन्मकाळ साजरा करण्यात येणार आहे. भगवा सदरा, भगवा पोषाख, भगवी साडी असे परिधान करून शोभायात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सोबतच ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर चित्पावन संघ, कर्हाडे ब्राह्मण संघ तसेच सकल ब्राह्मण समाज यांच्या संयुक्त विद्यमाने १९ एप्रिलला दुपारी ४ वाजता शोभायात्रेद्वारे पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीमध्ये प्रबोधनपर संदेश देणारे फलक, आकर्षक जिवंत देखावे सादर केले जाणार आहेत. ही मिरवणूक पद्याराजे गर्ल्स हायस्कूल येथून चालू होऊन विविध मार्गांवरून जाऊन निवृत्ती चौक येथे पोचेल. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक पुन्हा पद्याराजे गर्ल्स हायस्कूल येथे परत येईल. त्यानंतर पाळणा आणि आरती कार्यक्रम पार पडेल. श्री. इंद्रनील बंकापुरे यांचा ‘मंदिराच्या देशा’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या सोहळ्यासाठी ज्ञाती बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी