
बीड, 16 एप्रिल (हिं.स.)। मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक आणि आर्थिक हक्कांसाठी सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. १७) बीडमध्ये आरक्षण मोर्चाची हाक देण्यात आली आहे. याला जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांनीही प्रतिसाद देत पाठिंबा दिला. राज्य शासनाने रद्द केलेल्या पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
'आरक्षण आमचा हक्क आहे, शिक्षण आणि नोकरीत समान संधी द्या, अन्याय सहन करणार नाही' असे म्हणत जिल्हाभरात सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीचे प्रमुख अरबाज पठाण यांच्यासह पदाधिकारी जनजागृती करत आहेत. आरक्षण रद्द केल्याने समाजाच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मुस्लिम आरक्षण मोर्चाला जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. विविध भागांतून येणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्यावी, असे पत्रही पाडळशिंगी व अंबाजोगाईच्या टोल व्यवस्थापकांना दिले आहे. यामध्ये खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, माजी आमदार पृथवीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बळिराम गवते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदींचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis