
पुणे, 16 एप्रिल (हिं.स.)। मावळ तालुक्यातील बौर, करुंज व ब्राह्मणवाडी येथील शेतकरी आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. डुडी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, संबंधित भागातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद करण्यात येतील. हा प्रकल्प होणारच असून, याबाबत वरिष्ठांना सविस्तर माहिती देऊन अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर घेतला जाईल.
यावेळी मोजणी प्रक्रियेला विरोध करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्या. जमीन संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, याची खात्री देण्यात आली. या भागात एमआयडीसी झाल्यास मोठ्या प्रमाणावर विकास होईल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु