परतवाडा प्रकरणात तपासाला वेग; आ. प्रवीण तायडे यांचे पीडितांना पुढे येण्याचे आवाहन
अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) परतवाडा येथे मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली असून तपासादरम्यान धक्काद
परतवाडा प्रकरणात तपासाला वेग; आमदार प्रवीण तायडे यांचे पीडितांना पुढे येण्याचे आवाहन


अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)

परतवाडा येथे मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली असून तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत ८ पीडितांशी संबंधित १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.या प्रकरणी ११ एप्रिल रोजी परतवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, घटनेला पाच दिवस उलटूनही एकही पीडित किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अधिकृत तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पुरावे हाती लागूनही प्रत्यक्ष तक्रारींचा अभाव असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया गुंतागुंतीची ठरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण तायडे यांनी पीडित मुली व त्यांच्या कुटुंबीयांना धैर्याने पुढे येण्याचे आवाहन केले आहे. “पीडितांनी भीती न बाळगता पोलिसांकडे तक्रार द्यावी. त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडूनही याच प्रकारचे आवाहन करण्यात येत असून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपासाची गती वाढवून तांत्रिक पुरावे, सोशल मीडिया तपशील आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू ठेवली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांचाही शोध घेतला जात आहे.एकूणच, या संवेदनशील प्रकरणात पीडितांनी पुढे येणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून त्यावरच पुढील तपासाची दिशा अवलंबून राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande